Friday, May 23, 2008

झाले मोकळे आकाश - ५


दोन दिवस तसेच गेले.शुक्रवार उगवला. अभिने ठरवले, नितूला उद्या संध्याकाळी भेटायचे. आणि सारे बोलायचे. जे काही होईल ते एकदाच होवून जाउ दे.
दुपारी चहाची वेळ झाली. अभि नितूकडे आला.
’चल चहा घेउन येवू..खूप झोप येते आहे..’
’चल... कालपण रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहिला वाटतं’, ती उठता उठता म्हणाली.
....
.
.
’तू उद्या संध्याकाळी काय करते आहेस..’
’काही नाही.. का रे?’
’मग उद्या ची संध्याकाळ तू मला देणार आहेस..’
’हे काय अचानक...काय विशेष?’
’ते तुला तेव्हाच सांगेन.’
अभि असे भेटायचे म्हणतोय म्हणजे ह्याला काय बोलायचे असेल ह्याची नितीकाला जरा कल्पना आली, पण तरी तिने विचार केला, जे घडते आहे ते घडू द्यावे.
’बरं बाबा.. ठीक आहे’.
-----------------------------------------------------------------------
ठरलेल्या ठिकाणी अभिजीत नितीकाची वाट पहात उभा होता. हवा जरा ढगाळच होती. पाउस पडेल की काय असे वाटत असतानाच, पाच-दहा मिनीटात नितीका आली. ती आज नेहमीपेक्षा वेगळीच भासली त्याला. खास त्याच्यासाठी तयार झाली होती ती. लेमन कलरचा नाजूक ड्रेस, जोडीला लाईट मेक-अप, केसात मोग-याचा गजरा, त्याला नव्यानेच भेटत होती ती जणू..
थोडा वेळ असाच गेला.. ऑफिसच्या गप्पा झाल्या.. अवांतर चर्चा झाली..खाण्याची ऑर्डर देवून झाली. अभि काही विषय काढेना..
’हं काय विशेष आहे ते सांगितले नाहीस तू अजून?’ - नितीका
’अं...हं सांगतो ना..काय घाई आहे... तुला घाई नाहिये ना..?’- अभि आज पहिल्यांदाच इतका नर्व्हस झाला होता.
’नाही..अजिबात घाई नाहीये..अगदी निवांत आहे मी.. आज की शाम आपके नाम..’ ती हसली..आणि तो ही..
..
.
.
’नितीका..’
’हं.. बोल ना..’
’काही सांगायचं आहे तुला... I mean काही विचारायचे आहे..’ अभि अजुनही नर्व्हस होता. त्याचे पाय थरथरत होते.. पोटात मोठा खड्डा पडला होता.
’सांगायचे की विचारायचे..?’
’दोन्ही.....नितू...नितू, मला तू खूप आवडतेस...आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे..तू माझ्याशी लग्न करशील?’ अभिने एका दमात सगळे सांगितले..
इतक्या वेळ अवखळ वाटणारी नितू एकदम गंभीर झाली. तिला अपेक्षित होते हे.तिने तिच्या मनाची तयारी केली होतीच..
’अभि, अभि मला ही तू तितकाच आवडतोस.. तू माझ्या आयुष्याचा जोडीदार होशील या सारखे सुख आणखी काय असू शकेल?पण...’ नितू पुन्हा उदास झाली.
’पण? पण काय नितू? हा पण का आहे मध्ये? असे काय कारण आहे ज्यामुळे आपण एक होवू शकत नाही?’
’कसे सांगू तुला...’ नितूचे डोळे भरले...
’जे काही असेल ते सांगून टाक बरं.. तुझं मधेच माझ्या जवळ येणं, मग अचानक असं उदास होणं, परक्यासारखं वागणं, ह्या सा-याचा मला अर्थच लागत नाहीये.’
’अभि, मी तुझ्याशी खोटं बोलले रे..’
’काय झालंय नक्की...?’
-----------------------------------------------------------------------
तिने त्याला सारे सांगितले. तिची कथा ऐकून त्याच्याही डोळ्यात पाणी आले.तिने असे काही भोगले असेल, त्याचा विश्वासच बसेना. आणि आपल्याला हे कधीच कसे जाणवले नाही याचे त्याला आश्चर्य वाटत होते..त्याने स्वत:ला सावरले.
’नितू, तू जे काही सांगितलेस ते खरंच अतिशय दु:खद आहे..तू माझ्यापासून हे सारे लपवलेस ते चूक केलेस, तुझी माझी मैत्री इतकी घनिष्ट असतानाही तू मला तुझे दु:ख जाणवू दिले नाहीस याचे फार वाईट वाटते मला.. आणि याचा आपल्या लग्नाशी काय संबंध?’
'खरं सांगू का अभि, ह्या घटनेने मला खूप काही शिकवले आहे. आई-बाबा वेगळे होताना झालेला त्रास मी अजून विसरली नाहीये. अजून आठवले तरी शहारा येतो. आणि त्यांची मुलगी म्हणून मला माझ्या मामीने केलेला मानसिक छळ तर केवळ अमानुष होता. एकटी म्हणून आईला कितीतरी भोगावे लागले. . मला सांग, माझा आणि आईचा काय दोष ह्या सगळ्यात? समाजाच्या ह्या दृष्टीकोनाचीच भिती बसली आहे मनात. स्वत:ला सुशिक्षीत म्हणवणारे लोक जेव्हा एका घटस्फोटित बाई विषयी भले-बुरे बोलतात, वागतात, तेव्हा वाटते, खरंच हे लोक सुशिक्षीत आहेत?
मनात एक न्युनगंड निर्माण झालाय रे.. आपल्याला कोणी स्विकारेल की नाही? माझी कौटुंबिक माहिती समजल्यावर तू मला दूर तर करणार नाहीस ना? आपल्या मैत्रीत अंतर तर पडणार नाही ना? तुझ्या आई बाबांना काय वाटेल, अशा घरातली मुलगी, सून होवून आपल्या घरात आली तर? तुमचे नातेवाईक.. ते काय म्हणतील?’ नितूच्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते, आणि मनातले प्रश्नही..
’हे बघ जे काही घडले त्यात तुझा काहीच दोष नाही...तुझा आणि तुझ्या आईचाही. मी समजू शकतो, तुम्ही काय काय सहन केले असेल. हे बघ, मी तुझ्यावर प्रेम केलयं, तुझ्या व्यक्तिमत्वावर, स्वभावावर, विचारांवर... जे काही घडले ते थांबवणे तुझ्या हातात नव्हते, बाकीचा समाज काहीही म्हणो, तुला दूर करण्याइतका वाईट मी नक्कीच नाही.आणि माझे आई-बाबाही. ते खूप समंजस आहेत. मला खात्री आहे, ते नक्की स्विकारतील तुला सून म्हणून. बाकी समाज, नातेवाईक काहीही म्हणू देत, मला देणे-घेणे नाही.
ए आतातरी रडू नकोस प्लीज...आणि आता पुन्हा कुठेही जाऊ नकोस मला सोडून...मागे गेलीस आणि इतक्या वर्षांनी भेटलीस.. आता तुला लग्नाच्या बेडीतच अडकवणार आहे मी..आणि माझ्याशी खोटं बोलल्याची शिक्षाही देणार आहे...ए अगं, आता हस ना जरा..’
नितूच्या रडून लाल झालेल्या गालावर हास्य फुलले.
हातात हात घेऊन दोघे बाहेर पडले, तेव्हा आकाश निरभ्र झाले होते.. नितिका तिचे भविष्य अभिच्या हाती सोपवून निर्धास्तपणे चालू लागली.

---------------------------------------

समाप्त.

No comments: