Thursday, May 22, 2008

झाले मोकळे आकाश-४

रात्रीचे जेवण एका मैत्रिणीबरोबर उरकून नितीका रुमवर आली. रेडिओ सुरु केला. मिर्चीवर ’पुराने जिन्स के पॉकेटसे’ सुरु होते. ’तुमको देखा तो ये खयाल आया...जिंदगी धूप तुम घना साया...’ जगजितजी गात होते..
नितीकाला अभिची आठवण आली. आठवायला खरतर ती विसरलीच कुठे होती त्याला? मनाच्या तळघरात त्याच्या आठवणी बंदिस्त करुन ठेवल्या होत्या... आज तो भेटला आणि त्या तळघराचे कुलूप ताडकन तुटून पडले..सा-या आठवणी पुन्हा मोकळ्या झाल्या..
तिलाही खूप छान वाटले अभिला भेटून. अनाथ-एकाकी जगताना तो असा अचानक समोर येइल असे तिला स्वप्नातही वाटले नव्ह्ते. या सुखद योगायोगाने ती खूप सुखावली होती. पण तरीही मनात भिती होतीच.. आधी रुजलेले नाते इतक्या वर्षांनी फुलेल? त्याच्या आयुष्यात आणखी कोणी मुलगी आली असेल तर? माझ्यामुळे त्याच्या मनात आता चलबिचल होणार नाही ना?
ती अकरावी - बारावीत असताना, त्या दोघामध्ये एक नाजूक बंध तयार झाला होता. दोघांपैकी कोणीही ते बंध शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही एकमेकांविषयीची ओढ वाढतच होती.मैत्रीच्याही पलिकडले नाते जुळले आहे हे त्याच्याइतकेच तिलाही जाणवत होते. पण आज न उद्या त्याचा विरह वाटयाला येणार आहे हे ही तिला माहिती होते.
तिच्या आई-बाबांचे पटत नव्हते. बाबांच्या आयुष्यात आणखी कोणीतरी आले आहे हे तिला समजले होते.वेगळे होण्याइतकी परिस्थिती निर्माण झाली आणि आईने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तीही सरकारी नोकरीत करत होती. प्रकरण न्यायालयात गेले. नितीकाचा शिक्षणाचा हा टप्पा पार पडेपर्यंत पुण्यातच रहायचा निर्णय झाला.
आता दोघीच मायलेकी अभिच्या शेजारच्या सोसायटीत रहायला आल्या होत्या. या नव्या जागेत कुणालाही त्यांनी खरी परिस्थिती सांगितली नाही. तिची बारावीची परिक्षा झाली की मुंबईला नितीकाच्या आजोळी जायचे हे आधीच ठरले होते.
अभिशी मैत्री केल्यावरही नितीका त्याला ह्याविषयी एक शब्द ही बोलली नाही. तिचा जीव त्याच्यात गुंतत चालला होता. अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता ती ते नाते जोपासत होती, शेवट दिसत असुनही ती स्वत:ला थांबवू शकली नाही. दोघेही एकत्र अभ्यास करायचे..तिला लागेल ती मदत अभि करायचा.
बारावीची परीक्षा संपली आणि त्या मुंबईला जायला निघाल्या. बाबांची मुंबईला बदली झाली आहे हे कारण सांगून तिने त्याच्या प्रश्नांमधून स्वत:ची सुटका करुन घेतली.
-----------------------------------------------------------------------
नितू मुंबईला आली त्याला दोन महिने होत आले होते. अभिचा आणि तिचा पत्रांचा खेळ सुरु झाला.
बारावीचा रिझल्ट लागला, तो आणायला ती पुण्याला गेली. तिचे मेरीट थोड्या मार्कांसाठी हुकले होते. तिने पुण्यात गेल्यावर अभिला फोन केला. दोघे भेटले. पोटभर गप्पा मारल्या.. तास- दोन तास त्याच्याबरोबर घालवून नितिका परत आली.
लवकरच तिच्या मामीला कळले की की नितूला पुण्याहून नियमित पत्र येतात. आईला ही माहिती होते पण आईला त्यात काही गैर वाटले नाही. मामीने मात्र तिला त्यावरुन बोलायला सुरु केले. मामीला त्या दोघींचे तिथे रहाणे पसंत नव्हते. नितूची आई कमावती होती, तरीही तिच्या संसारात तिला या दोघींचे अस्तित्व नकोसे वाटत होते. मामी उघड उघड बोलू लागली..’ही काय नसती थेंर ह्या मुलीची.. कोण कुठला मुलगा त्याला एवढी पत्र ! नक्कीच काही तरी लफडं असणार तुझं.. बापाने दिवे लावलेच आता पोरगी ही त्याच वळणाने जाणार का? आमच्या घरात हे असले खपवून घेणार नाही.’
नितूने मनावर दगड ठेवला आणि पत्र पाठवणे हळूहळू बंद केले.एकदा तिला वाटले की त्याला सगळे सांगावे. पण आपल्याच आई-बाबांविषयी सांगण्याचे तिला जिवावर आले. तिने तिथेच थांबायचा निर्णय घेतला.
तिला मुंबईतल्या नावाजलेल्या इंजिनियरींग कॉलेजला प्रवेश मिळाला. आईची नोकरी सुरुच होती.
हळूहळू मामीचा त्रास वाढला. नितूला अभ्यास करणे ही अशक्य होवू लागले. लवकरच दोघी तिथूनही बाहेर पडल्या.
-----------------------------------------------------------------------
इंजिनियरींग संपता संपताच नितीकाला कॉलेजच्या कॅंपस मधून एका मोठ्या I.T. कंपनीत नोकरी लागली. B.E. झाली की लगेच जॉईन व्हायचे होते. तिला अभिची आठवण आली. कॉलेज मधे खूप मित्र मैत्रिणी मिळाल्या, पण अभिची जागा अढळ होती.तो खूप खुष झाला असता माझे यश समजल्यावर.
आता जरा सुखाचे दिवस आले.. आईचे कष्ट कमी झाले.ती आईच्या मागे लागली, आता नोकरी बास..घरी बसून निवांत आराम कर. पण ती ऐकेना.. म्हणायची, तू लग्न करुन गेलीस की मी एकटी दिवसभर घरी काय करु? आईचा गोरेगाव ते नरिमन पॉईंट प्रवास करणे सुरुच होते.
एक दिवस अचानक लोकलमध्ये बॉंबस्फोट झाले. आई ज्या लोकलने प्रवास करायची ती लोकलही त्या तडाख्यात सापडली. नितीकाचा एकुलता एक आधार, तिची आई..तिचे शेवटचे दर्शन ही नितूला घडले नाही. नितिका अनाथ, पोरकी झाली.
-----------------------------------------------------------------------
नितीका अगदी एकाकी पडली होती. मामा मामी पंधरा दिवस राहून गेले. बाबांनी सांत्वनाचा एक फोन केला फक्त. ती सुकून गेली. कशातच रुची वाटेना. घरी सारे उदास. जिथे तिथे आईचे अस्तित्व जाणवे. घरी आले की घर खायला उठे ! मुंबईच्या गर्दीत तिचा जीव गुदमरु लागला. तिने पुन्हा पुण्यात यायचा निर्णय घेतला. कंपनीने बरेच आढेवेढे घेत शेवटी तिची बदली मंजूर केली.
नितीका पुन्हा पुण्यात आली.
-----------------------------------------------------------------------
नितीकाला पुण्यात येवून सहा महिने झाले. तिला अधून मधून अभिची आठवण यायची.
मोबाईलवर त्याचा घरचा नंबर टाईप करायची कित्येकदा, पण तिचे धाडस होत नव्हते. त्याने जर काही विचारले तर त्याला काय उत्तर द्यावे तिला समजत नव्हते. आणि आता इतक्या वर्षांनी तिला तिचा अभि भेटेल की नाही अशी शंका होतीच. त्यापेक्षा त्याच्या सुखद आठवणीत रमणेच तिला जास्त योग्य वाटले.
मुंबईचे काही मित्र मैत्रिणी पुण्यात नोकरीसाठी रहात होते. त्यांच्यात तिचा वेळ जायचा. पण तरीही एकटेपण जाणवायचे. मामाने तिला तिच्यासाठी मुलगा बघू का विचारले. तिने नम्रपणे नकार कळवला.
मधेच कधीतरी तिच्या बाबांचा तिला फोन आला. त्याना तिची गरज होती.तिचा आधार हवा होता. नितूची द्विधा मनस्थिती झाली. एकीकडे १५-१६ वर्षे त्यानी दिलेले प्रेम आणि दुसरीकडे त्यांच्यामुळे तिची व आईची झालेली होरपळ. त्यांना पुन्हा आपलेसे करावे की नाही तिला समजत नव्ह्ते.
-----------------------------------------------------------------------
आणि ग्रीष्माच्या तडाख्यानंतर वळवाचा पाउस बरसावा त्याप्रमाणे रुक्ष एकाकी आयुष्यात पुन्हा अभिचे आगमन झाले होते. तिला तो रोज भेटणार होता. दिवसाचे आठ-नऊ तास तो तिच्या डोळ्यासमोर दिसणार होता. आज खूप दिवसांनी तिला शांत झोप लागली.
-----------------------------------------------------------------------
नितीकाला अभिजीतचे प्रोजेक्ट जॉईन करुन २ महिने झाले. अभिच्या सहवासात ती तिचे दु:ख थोडेफार विसरली.अधून मधून बाबांचा फोन यायचा आणि मग ती अस्वस्थ व्ह्यायची. अभिला ते तिच्या कामातून जाणवायचे. तिला तिचे दु:ख कोणालाही सांगता येत नव्हते. आणि ती अशी उदास का हे कोडे अभिला सुटत नव्ह्ते.
त्यांच्यातला संवाद पुन्हा वाढू लागला. सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचे एकत्र जेवण, जेवणानंतरच्या गप्पा.. कधीतरी रात्रीचा फोन.ती पुन्हा फुलू लागली.
दोघेही एकमेकांचा पुन्हा अंदाज घेत होते.
एकदा तिने जेवताना त्याला विचारले ,
"काय अभि लग्न कधी करतो आहेस.. म्हातारा व्हायला लागलास आता...!"
’हं करायचे तर आहे..पण कोणी होकारच देत नाही... तू हो म्हण.. लगेच करतो..." अभि पण चाचपडत होता, तिच्या मनाचा वेध घेण्यासाठी..
ती काही न बोलता हळूच गालातल्या गालात हसली, आणि अभिला गच्चीतली लाजरी नितू आठवली.
-----------------------------------------------------------------------
त्यादिवशी नितीकाच्या मनात सतत त्याचे शब्द रुंजी घालत होते. खरच होईल का माझे त्याच्याशी लग्न? तिला एकदम वाटून गेले. पण मग त्याला आपल्या बाबांविषयी सांगावे लागेल. त्याला जर कळले की आई-बाबा वेगळे झाले होते, तर त्याला काय वाटेल? तो त्याचा निर्णय बदलणार नाही ना? आणि त्याचे आई-बाबा...ते स्विकारतील का मला सून म्हणून? अणि इतके वर्ष मी त्याला माझ्या कुटुंबाविषयी खोटे सांगितले म्हणून मी त्याच्या मनातून तर उतरणार नाही ना..
असे जर काही झाले तर ते सहन करु शकेन का मी? इतक्या दिवसांच्या एकटेपणानंतर थोडा आनंद जीवनात येऊ पहातोय. पण भूतकाळाचे भूत त्याची वाट अडवून बसले आहे. काय करावे...तो नाही म्हणाला तर आहे ती मैत्री ही संपेल कदाचित.. त्यापेक्षा हे मैत्रीचे नाते जपायला मला जास्त आवडेल..
तिला काहीच सुचत नव्हते.
-----------------------------------------------------------------------
अभि थोडा अस्वस्थ होता. नितीकाच्या आयुष्यात दुसरे कोणी नसावे, त्याचे मन त्याला सांगत होते. पण मग ती मध्येच अशी तुटक का वागते.. उदास का होते... काही समजत नव्हते.
आईला जाणवले, आज अभिचे जेवणात लक्ष नाही. ताटतला पहिला भात कितीतरी वेळाने संपवून तो अर्धवट जेवण करुन उठला. तो गच्चीवर गेल्याचे तिच्या नजरेतून सुटले नाही.
स्वयपाक घर आवरुन ती वर गेली. अभि विचारांमध्ये इतका हरवला होता की, आई शेजारी उभी राहिली आहे हे ही त्याला कळले नाही. त्याचा हाता हातात घेत तिने विचारले,
’काय झालय राजा? इतका अस्वस्थ का आहेस? ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का?’
अभिने थोडा विचार केला आणि आईशी बोलायचे ठरवले. त्याने तिला नितीकाविषयी सारे सांगितले, अगदी ती शेजारी रहायची तेव्हापासून तिच्याबद्द्ल असलेल्या त्याच्या भावना... आत्ताचे तिचे वागणे सारे..
’माझे प्रेम आहे गं तिच्यावर, तिला असे उदास बघून माझा जिव तुटतो तिच्यासाठी.. काय करु काहीच समजत नाही...’
आईला सारे लक्षात आले.ती त्याला म्हणाली, ’तू तिच्याशी बोलत का नाहीस एकदा..? तुला जे वाटते ते सारे सांगून टाक..नक्की काहीतरी मार्ग निघेल..
-----------------------------------------------------------------------
क्रमश:

2 comments:

xetropulsar said...

भाषा ओघवती. . .मांडणी सुंदर. . कोड्याचे तुकडे पटापट एकमेकांत बसून गेले.

हा शेवटचा परिच्छेद मात्र थोडा खटकला. . .मुले या विषयांवर आईशी बोलत नाहीत हा आमचा अनुभव.

हम्म्म्. . .झाले मोकळे आकाश या शिर्षकावरून व आत्तापर्यंतच्या कथेवरून या कथेचा शेवट(तुम्ही अचानक बदलला नाही तर) काय असेल ते लक्षात आलंच आहे. .स्तुत्य प्रयत्न

अमित

shreya said...

शेवटही वाचायला अवडेल... उस्तुकता आहे..!
त्याने केले का त्याचे मन तिच्यापाशी मोकले... ? झाले का त्यांचे लग्न....?