Tuesday, July 17, 2007

आंधळे प्रेम

एका मैत्रिणीच्या अनुभवावर आधारित...
-------------------------------------

ती आणि तो..
कॉलेजमध्ये एकत्र शिकले..
ती सुंदर आणि तो हॅंड्सम,
त्याने तिला ’विचारले’
आणि तिने लाजून होय म्हंटले...

तुम्ही म्हणाल,
ह्यात काय विशेष?
हे तर नेहमीच घडते...

दोघांनाही घरून विरोध झाले..
पण प्रेमाला कोण बांध घालू शकले?
दोघेही सेटल झाले...
प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले...

तुम्ही काय विचार करताय...?
सारे कसे आलबेल झाले.!
अगदी सिनेस्टाईल झाले... !
पण इथे सिनेमाचा The End होतो...
आणि आयुष्य इथूनच सुरू होते!

राजा राणीचा संसार सुरु झाला...
नव्या नवलाईत प्रेमाला बहर आला!
हळूहळू गाडी पुढे सरकली...
बहर फुलण्याआधी,
ओसरायला सुरुवात झाली...

तिचे आचार विचार, संस्कार,
त्याच्याहून वेगळे होते...
तिच्या आधुनिक विचारांना,
त्याच्या संकुचित वृत्तीचे कूंपण होते!

तिच्यासाठी तो अजूनही मित्रच होता,
त्याच्यालेखी मात्र ती पायातली वहाण होती..
प्रेयसी आता बायको झाली होती...
तो म्हणेल ते सारेच तिने ऐकावे,
त्याची अपेक्षा होती...

त्याच्या वृत्तीला विरोध करण्याचा,
तिने गुन्हा केला!
तिला शिक्षा देण्या,
त्याच्यातील राक्षस जागा झाला...

शिविगाळ, मारामारी,
रोजचीच सुरु झाली...
आपण ज्याच्यावर प्रेम केले,
तो हाच का?
तिची मती गुंग झाली !

नक्की कुठे चुकले,
ती शोध घेऊ लागली..
आंधळ्या प्रेमाने घात केला.
तिला जाणिव झाली !

आता मात्र ती सावध झाली!
सुटका करुन घेण्यासाठी,
तिने धडपड सुरु केली...
त्याची नजर चुकवून,
ती घरातून पळून गेली!

आणखी एका
आंधळ्या प्रेमाची परिणीती,
लवकरच घटस्फोटात झाली!

No comments: