Monday, June 18, 2007

Father's Day च्या निमित्ताने...


काल Father's Day होता... गेले २-३ दिवस रेडिओ मिर्चीवर Father's Day चे कौतुक सुरु होते...कधी नुकते बाबा झालेल्या लोकांची थेट मॅटर्निटी होम मधून "साला मै तो बाप बन गया.." म्हणत मुलाखत ऐकवली जात होती.. तर कधी तरुण तरुणीना वडिलाविषयीचा आदर आणि प्रेम शब्दांमधून ओसंडून वहात होते... हे सारे ऐकून मनात विचार आला की, मला जर कोणी, बाबांबद्द्ल एका वाक्यात बोलायला लावलं तर मी काय सांगेन? एका वाक्यच काय पण अगदी १० वाक्यं सुद्धा कमी पडतील..एका वाक्यात मी फार फार तर इतकेच म्हणेन... "I am proud to be his daughter !"
आम्हा तिघी बहिणींना बाबांनी कायम शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलंय..अमुक एक मला शिकायची आहे असं आम्ही म्हणालोय आणि बाबा त्याला नाही म्हणाले असे कधीच झाले नाही. अगदी सहा महिन्यांपुर्वी मी कार ड्राईव्हिंग शिकायचे म्हणाले,तेव्हांही ते नाही म्हणाले नाहीत.. आपल्याकडे कार कुठे आहे किंवा आपण कार घेऊ तेव्हा शिक, असे एकदाही म्हणाले नाहीत.स्पर्धा, परीक्षांमध्ये आम्ही यश मिळवावे यासाठी बक्षीसांचे अमिश असायचे...माझ्या चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या वेळेस, त्यांनी सायकलची पैज लावली..शिष्यवृत्ती मिळाली की सायकलचे बक्षीस! आणि ते मी मिळवले! आम्ही तिघींनी खूप शिकावे आणि भविष्यात स्वत:च्या पायावर उभे रहावे, यासाठी ते कायम धडपडत राहिले...
आपल्याला मुलगा नाही किंवा तीन मुली आहेत याची खंत त्यांच्या चेह-यावर पाहिल्याचे मला आठवत नाही ! या मुलींवर खर्च करुन काय उपयोग, या तर शेवटी दुस-याच्याच घरी जाणार, असा विचार त्यांच्या कृतीत मी कधीही अनुभवला नाही. त्यांनी सदैव आम्हाला मुलांसारखंच वागवलं, वाढवलं !
अर्थात इतर सर्वसामान्य बाबांप्रमाणे, त्यांनीही आमच्यावर काही बंधने घातली आहेत...मी जिन्स घालण्यावरुन आमचे किती तरी वेळा वाद झाले असतील.. पण त्यांनी कधीही मला त्यासाठी परवानगी दिली नाही! अर्थात ही सारी बंधने, आमच्या काळजीमुळेच आहेत !
आम्ही लहान सहान गोष्टीत स्वावलंबी असावे ह्याकडे त्यांचे लक्ष असते ! अगदी सायकलचे पंक्चर काढण्यापासून लाईटबिल भरण्यापर्यंत बाहेरची सगळी कामे करण्याची सवय लावली.आणि हे सगळे करताना, ते कधीही सोबत आले नाहीत.. मला लहानपणी इतका राग यायचा, की तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी एकटेच का पाठवता...? किमान पहिल्या वेळेस तरी सोबत चला.. ! पण आता पटतय, He wanted us to face the world.. he wanted us to become independent !
तीन वर्षांपुर्वी मला नोकरीची प्रथम संधी मिळाली. पण त्यासाठी मला मुंबईला रहावे लागणार होते. त्यावेळी बाबांनी आईचा विरोध पत्करून मला पूर्ण पाठिंबा दिला ! आणि त्यानंतर सलग दोन वर्षे, माझी पुण्यात बदली होईपर्यंत, ते दर सोमवारी थंडी पावसाची पर्वा न करता पहाटे पाचच्या बस करिता स्टेशन वर सोडायला आले. कितीही त्रास झाला तरी, पहाटे चार वाजता उठून ते, मला सोडण्यासाठी ४.३० ला तयार असायचे !
एक व्यक्ती म्हणून त्यांच्यात काही गुण दोष असतील... नव्हे आहेत...पण तरी एक पिता म्हणून म्हणून ते कायम माझे आदर्श आहेत...Really proud to be his daughter !

2 comments:

कोहम said...

chaan lihilay...mazya babanbaddhal me kahi lihava asa ata vattay..Thanks

अपर्णा said...

मस्त लिहिलं आहेस गं... तुझं पोस्ट वाचून मला का कुणास ठाऊक पण वपुंच्या ’बा’ कथेची आठवण झाली.